कविता - तुळस

तुळस

आठवतेस मला तू
तुरू तुरू चालणारी
दुडू दुडू धावणारी
गोबऱ्या गालांची
कुरळ्या केसांची
बोबडे बोल बोलणारी

पारिजातकाची फुले
दोघींनी वेचली
दमलो जरी खेळून
नाही आली दुखनी

मिळालेला खाऊ दोघींनी घेतला
एकीने दुसरीचा द्वेष नाही केला

आई रागावली तरी
नाही केली गाऱ्हाणी
बसे एकीला मार
दुसरीच्या डोळा पाणी

झोक्यावर बसून
गायली गं गाणी
एकीने दुसरीची
केली वेणीफणी

लोक म्हणती येताजाता
पोरी कोणाच्या गोजीरवाण्या ?
आजी गर्वाने म्हणे
नाती माझ्या गं देखण्या

गूजगोष्टी गं केल्या
ऐकल्या आजीच्या कहाण्या
माय कौतुकाने बोले
लेकी माझ्या गं शहाण्या

कसला गं जन्म हा
कशासाठी गं आटापिटा
होता वयाने मोठे
दोघींच्या गं दोन वाटा
माझ्या पाठच्या बहिणी
तुझ्या भेटीची गं लागे आस
दिसता अंगणी तुळस
होतो मला तुझा भास.


4 comments:

साळसूद पाचोळा said...

very good...
just keep it up....

सौ. मंगल अशोक कुदळे said...

Thank You !!

Harshad Khandare said...

मराठीमातीवर काही लिखान करणे आवडेल का?

Mahesh said...

मराठी ब्लॉगर्सचा पहिलावहिला ब्लॉगकॅम्प सिंहगड रोडवरील पु. ल. देशपांडे उद्यानात मोठ्या उत्साहात झाला, १६  जानेवारी १० ला त्याबद्दल सर्व मराठी ब्लॉगेर्सचे अभिनंदन :-) महेश

Post a Comment

Design by Blogger Templates