कविता - तुळस

तुळस

आठवतेस मला तू
तुरू तुरू चालणारी
दुडू दुडू धावणारी
गोबऱ्या गालांची
कुरळ्या केसांची
बोबडे बोल बोलणारी

पारिजातकाची फुले
दोघींनी वेचली
दमलो जरी खेळून
नाही आली दुखनी

मिळालेला खाऊ दोघींनी घेतला
एकीने दुसरीचा द्वेष नाही केला

आई रागावली तरी
नाही केली गाऱ्हाणी
बसे एकीला मार
दुसरीच्या डोळा पाणी

झोक्यावर बसून
गायली गं गाणी
एकीने दुसरीची
केली वेणीफणी

लोक म्हणती येताजाता
पोरी कोणाच्या गोजीरवाण्या ?
आजी गर्वाने म्हणे
नाती माझ्या गं देखण्या

गूजगोष्टी गं केल्या
ऐकल्या आजीच्या कहाण्या
माय कौतुकाने बोले
लेकी माझ्या गं शहाण्या

कसला गं जन्म हा
कशासाठी गं आटापिटा
होता वयाने मोठे
दोघींच्या गं दोन वाटा
माझ्या पाठच्या बहिणी
तुझ्या भेटीची गं लागे आस
दिसता अंगणी तुळस
होतो मला तुझा भास.


दोन जीवांची नाती

दोन जीवांची नाती

दोन जीवांची नाती
सांगे विश्वाची महती
दोन जीव हे वेगवेगळे
दोन ठिकाणी जन्म घेती
परी एकत्र नांदती
सांगे विश्वाची महती || दोन जीवांची नाती ... १

कोण कोठला 'तो' अन्
कोण कोठली 'ती'
एकमेका साथ देती
सांगे जीवाची महती || दोन जीवांची नाती ... २

कधी रडणे कधी रूसवा
कधी भांडण कधी अबोला
परी एकमेकाविना न राहती
सांगे जीवाची महती || दोन जीवांची नाती ... ३

कधी भासती राधा कृष्ण
विष्णू लक्ष्मीही कधी वाटती
भासती कधी कैलास पार्वती
सांगे विश्वाची महती || दोन जीवांची नाती ... ४

संसार रथाची दोन चक्रही
मानूनी बंधने युगयुगांची
एकमेका सवे चालती
सांगे विश्वाची महती || दोन जीवांची नाती ... ५

अल्प परिचय

अल्प परिचय

नाव - सौ. मंगल अशोक कुदळे
शिक्षण - B. A.
शालेय शिक्षण कोपरगाव येथे झाले. महाविद्यालयीन शिक्षण कोपरगावच्याच एस. एस. जी. एम. कॉलेज मधे. अगदी लहान पणापासून वाचनाची खूप आवड. लहानपणी घरातील मोठी भावंडे निरनिराळी पुस्तके, दिवाळी अंक आणायची. अशाच एका दिपावली अंकातील 'अद्वैत' नावाची कादांबरी मी दोन तीन वेळा वाचली. लेखक उद्धव ज.शेळके होते. माझे वय होते तेरा चौदा वर्षांचे. त्यावेळेसच ठरवले पुढे कधी तरी अशाच कथा लिहीन.

From पारितोषीक


शालेय तसेच महाविद्यालयीन शिक्षण झाले. लिखाणाचा विचार यायचा पण शब्द सुचत नव्हते. आणि जीवनाचा फारसा अनुभवही नव्हता. लग्नानंतर मी माळीनगर ला आले. सासरे माजी आमदार आणि स्वातंत्र्‍या सैनिक होते तसेच वारकरी पंतातले होते. घरात नेहमी माणसांची वर्दळ. त्यांना भेटण्यासाठी खूप लोक यायचे. बरेच लोक आपल्या अडचणी घेऊन यायचे, सल्ला मागायला यायचे. वीस वर्षे मी सासू सासरे यांच्या सहवासात राहीले. अनेक व्यक्तिरेखा जवळून बघितल्या. ही जुन्या जमान्यातील प्रेमळ माणसे गेली आणि आयुष्यात एक प्रकारची पोकळी निर्माण झाली. त्याचवेळेस मी हातात पेन घेतले. मी लिहिलेल्या पहिल्याच कथेला दैनिक सकाळचे "दीपावली अंका कथा स्पर्धा" चे बक्षीस मिळाले. नंतर लागोपाठ लिहिलेल्या सहा कथा प्रसिद्ध झाल्या . नंतर विचार केला, मी जर कथा लिहु शकते तर कविता का लिहु शकत नाही? आणि मी लिहिलेली पहिलीच कविता 'आई' साहित्य धारा प्रकाशणाणे प्रसिद्ध केली. नंतरच्या पाठविलेल्या सर्व कविता सोलापूर च्या 'दैनिक संचार' मधे प्रसिद्ध झाल्या.


एक संध्याकाळ

एक संध्याकाळ

एक संध्याकाळ
सप्तसुरांची
जुन्या गितांची
रंगून जाण्याची
एक संध्याकाळ
उदास मनाची
जुन्या आठवणींची
हरवून जाण्याची
एक संध्याकाळ
वाट बघण्याची
वेडावून जाण्याची
तुझ्या आठवणींची
एक संध्याकाळ
क्षितीजा पलीकडची
रीत्या मनाची
निसटत्या क्षणांची
एक संध्याकाळ
समुद्राकाठची
उसळत्या लाटांची
मोहरुन जाण्याची
एक संध्याकाळ
तुझी नी माझी
स्वप्ने बघण्याची
धुंद होउन जाण्याची
एक संध्याकाळ
फक्त माझी
मिटल्या ओठांची
शांत मनाची
अंतर्मुख होण्याची.

माझी पुस्तके

माझी पुस्तके

1. सुलक्षणा - (कथासंग्रह, 2000)
2. उनसावली - (कथासंग्रह, 2000)
(कलायात्री प्रकाशन, मुंढवा, पुणे, मो. 9421075235)
3. शब्दांकन, कुर्यात सदा मंगलम, लेखक आदेश बोरावके
(विवाह विषयक मार्गदर्शन करणारे पुस्तक)

पुरस्कार

मनोगत

मनोगत

उन सावली हा माझा पहिलाच काव्य संग्रह आहे. रोजच्या जीवनात काही प्रसंग मनाला स्पर्श करून जातात, हृदयात घर करून राहतात, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये ही काव्य दिसू लागते. सुख आणि दुखः दोन्हीवर ही कविता लिहिता येते. माणसाचं आयुष्याचं मुळ उन सावल्यांचा खेळ आहे.


आई

आई

सायंकाळी
कातरवेळी
चिमणी पाखरे
घराकडे परतती
त्यावेळी मला
तुझी आठवण येते.
अंगणातली गाय
बघून पाडसाला
जेव्हा हंबरते
त्यावेळी मला
तुझी आठवण येते.
सोनुली माझी
लागे रडू
तिला घास भरवते
त्यावेळी मला
तुझी आठवण येते.
येई सांगावा आईचा
सखी शेजारीण
माझी
माहेरी निघते
त्यावेळी मला
तुझी आठवण येते.
घाव बसे मर्मावर
शब्द बोचती
काट्यासम
डोळे आसवे
गाळती
त्यावेळी मला
तुझी आठवण येते.
होई दुःखाचा उद्रेक
बोल जिव्हारी लागते
हवे धीराचे
दोन शब्द
आई तुझी
आठवण येते
तुझी आठवण येते.

Design by Blogger Templates